
भिवंडी, ता. २ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील रिटेल क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ या राज्यातील पहिल्या भव्य आउटलेट मॉलचे उद्घाटन गुरुवारी भिवंडीतील भूमी वर्ल्ड संकुलात करण्यात आले. वर्षभर नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर मोठ्या सवलती उपलब्ध करून देणारी ही संकल्पना ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गालगत उभारण्यात आलेल्या या मॉलमध्ये १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स उपलब्ध असून, फॅशन, फुटवेअर, स्पोर्ट्सवेअर, अॅक्सेसरीज, लगेज, घड्याळे, ज्वेलरी आणि लाइफस्टाइल उत्पादनांची विस्तृत श्रेणी एकाच छताखाली ग्राहकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, वर्षभर ७० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ ग्राहकांना घेता येणार असल्याने हा मॉल पारंपरिक एंड-ऑफ-सीझन सेलच्या संकल्पनेला पर्याय ठरणार आहे.आउटलेट मॉल ऑफ इंडियाची संकल्पना ग्राहकांना प्रीमियम ब्रँड्स किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यावर आधारित आहे. त्यामुळे ग्राहकांना सेलची वाट न पाहता, वर्षभर त्यांच्या सोयीने आकर्षक दरात खरेदी करता येणार आहे. अधिक पर्याय, अधिक बचत आणि दर्जेदार खरेदीचा अनुभव देण्यावर मॉल व्यवस्थापनाचा भर असल्याचे उद्घाटनावेळी सांगण्यात आले.यावेळी मॉलच्या व्यवस्थापनाने सांगितले की, आजचा ग्राहक गुणवत्ता, विविधता आणि परवडणाऱ्या किमतीचा समतोल शोधत आहे.
त्याच गरजा लक्षात घेऊन ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ची उभारणी करण्यात आली असून, येथे ग्राहकांना वर्षभर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळणार आहे.खरेदीसोबतच विविध खाद्यपदार्थांचे पर्याय, कुटुंबांसाठी आवश्यक सुविधा आणि निवांत वेळ घालवण्यासाठी आधुनिक वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे हा मॉल केवळ शॉपिंगपुरता मर्यादित न राहता संपूर्ण रिटेल आणि लाइफस्टाइल डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्यात आला आहे. मूल्याधारित खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता, ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ ग्राहकांसाठी पसंतीचे नवे शॉपिंग केंद्र ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.