
ठाणे, ता .२ (प्रतिनिधी): श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा उत्सव जवळ येताच बाजारपेठांमध्ये राधा-कृष्णाच्या वेशभूषेची आकर्षक दुनिया सजली आहे. लहान मुलांना कृष्ण आणि राधेचा पारंपरिक पेहराव करून सजविण्याची पालकांमध्ये मोठी उत्सुकता असून, विविध प्रकारच्या पोशाखांसह दागिने आणि सजावटीच्या साहित्याला चांगली मागणी मिळत आहे.
पारस अँड सन्स येथे कृष्णाच्या पोशाखांची किंमत सुमारे २०० रुपयांपासून सुरू होत असून, कृष्णासाठी आकर्षक माळ ३० ते ४० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच मुकुट, माळ, बासरी आणि अन्य सजावटीच्या साहित्याचा समावेश असलेला संपूर्ण कृष्ण सेट १८० रुपयांपासून उपलब्ध करण्यात आला आहे. राधेच्या वेशभूषेसाठीही ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध आहेत. राधेचा पोशाख दीडशे रुपयांपासून सुरू होत असून, पारंपरिक फ्रॉक ३०० रुपयांपासून उपलब्ध आहे. राधेसाठी खास ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये नेकलेस, बो, बांगड्या, मांगटिका आदी आकर्षक दागिन्यांची रेलचेल आहे. या दागिन्यांच्या किंमती साधारण ६० ते ८० रुपयांपासून, तर काही बांगड्यांचे संच १२५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा पारंपरिक वेशभूषेसोबतच आकर्षक आणि रंगीबेरंगी डिझाइनच्या पोशाखांना पालकांकडून विशेष पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लहानग्यांना कृष्ण-राधेच्या रूपात सजविण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली असून, बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर राधा-कृष्णाच्या पोशाखांना चांगली मागणी आहे. पालकांना संपूर्ण सेट एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी मुकुट, बासरी, माळ आणि दागिन्यांचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मात्र यंदा दर वाढीचा फाटका बसला नाही आहे,” असे पारस अँड सन्सच्या विक्रेत्यांनी सांगितले.