
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने प्रयागराज येथून अटक केले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ आणि खंडणीविरोधी पथकाने संयुक्तरित्या ही धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत त्यांनी गुन्ह्यातील आणखी एक फरार आरोपी अमित सिंग उर्फ पपलु याला देखील बेड्या ठोकल्या आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या हत्याकांडानंतर पोलिसांच्या पथकांनी गुन्हे दाखल करत फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना केली होती. दरम्यान आज पोलिसांच्या पथकांनी हत्याकांडातील मुख्य आरोपीसह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळणार असून या हत्याकांडामागे नेमके कारण काय, हत्येचा कट कसा व कोणी रचला आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे? याचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे.