
ठाणे, ता. 1 (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाने ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पूर्णेकर यांचा जुना मित्र पप्या शिंदे याला अटक केली असून, आणखी चार आरोपी फरार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांकडून ठाणे महापालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर अशा स्वरूपाचा आरोप पहिल्यांदाच झाला आहे. अनेक व्यक्तींशी वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र कोणाच्याही जीवाला धोका निर्माण करणारे कृत्य आपण कधीही केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “प्रदीप पूर्णेकर यांच्यासोबत वैचारिक मतभेद होते. मात्र, त्यांची हत्या करण्यासारखे कृत्य माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबीयांकडून कधीच घडणार नाही,” असे मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले. या घटनेला राजकीय रंग देऊन बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील पोलिस चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “पोलिस प्रशासन करत असलेल्या चौकशीला मी सहकार्य करणार आहे. माझी चूक नसेल तर चौकशीला सामोरे जाण्यास मला कोणतीही अडचण नाही,” असे त्या म्हणाल्या. दरम्यान, काही राजकीय नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवरही त्यांनी टीका केली. सध्या आपण बाहेर असून ठाण्यात परतल्यानंतर या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस तपासाबरोबरच या प्रकरणातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांकडेही लक्ष लागले आहे.