
ठाणे, ता. ११ (प्रतिनिधी) : शहराच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी लायन्स क्लब ऑफ ठाणे अर्बन आणि लायन्स क्लब ऑफ ठाणे प्राइड यांच्या संयुक्त विद्यमाने मेगा वैद्यकीय तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कासारवडवली, ठाणे पश्चिम येथील मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या कास्टिंग यार्डमध्ये हे शिबिर घेण्यात आले असून कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यवी लाभला.
कठीण कामाचे वेळापत्रक आणि रोजच्या धावपळीमुळे अनेक बांधकाम कामगारांना नियमित आरोग्य तपासणीसाठी वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. गरजू नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या लायन्स क्लबच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचा हा एक भाग होता. शिबिराचे उद्घाटन पीडीजी लायन सुरिंदर के. शर्मा आणि जीएसटी चेअरपर्सन लायन जिग्नेश दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. लायन मोहित अग्रवाल यांनी २५ कामगार आणि १५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी घेतलेले विशेष ध्यान आणि आरोग्यविषयक सत्र हे या कार्यक्रमाचे एक अतिरिक्त आकर्षण ठरले.
या शिबिराचे संयोजन अध्यक्ष व वैद्यकीय शिबिर विभागाचे जिल्हा समन्वयक लायन किरण गुलियानी आणि अध्यक्ष व युवा सक्षमीकरण विभागाचे जिल्हा समन्वयक लायन मोहित अग्रवाल यांनी केले; तसेच लायन ॲग्नेलो डिसूझा आणि लायन उत्तम वाघमारे या स्वयंसेवकांनी यात मोलाचे योगदान देत मनापासून सेवा केली. समता संस्कार सेवा फाउंडेशनच्या वैद्यकीय पथकाने तसेच समर्पण ब्लड बँकेच्या टीमने आरोग्य तपासणी व रक्तदान उपक्रमासाठी विशेष सेवा बजावली. या सेवाभावी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी झेडसी लायन हरीश गुलियानी, सर्व स्वयंसेवक तसेच मेघा इंजिनिअरिंगच्या व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.