
ठाणे, ता. ८ (वंशिका चाचे) : बैलपोळा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, त्यानिमित्त ठाणे बाजारपेठेत माती, लाकूड आणि फायबरपासून तयार केलेल्या आकर्षक बैलजोड्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यंदा १० सप्टेंबर २०२६ रोजी बैलपोळा साजरा होणार असल्याने बाजारपेठेत सणाची लगबग सुरू झाली आहे. विविध रंग, आकार आणि आकर्षक सजावटीच्या बैलजोड्यांनी बाजारपेठ सजली आहे.
बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकऱ्यांचा उत्साहाचा सण म्हणून पोळ्याला विशेष महत्त्व आहे. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिक आणि शेतकरी तयारीला लागले आहेत. बाजारपेठेत पारंपरिक मातीच्या बैलांसोबतच बच्चेकंपनीसाठी चाकांचे लाकडी आणि फायबरचे बैलही उपलब्ध आहेत. तान्हा पोळ्यासाठी या छोट्या बैलांना विशेष मागणी आहे.

मोठ्या आकाराच्या बैलजोड्या साधारण १५० ते २०० रुपयांना, तर छोट्या बैलजोड्या १०० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय बैलांच्या सजावटीसाठी बाशिंग, घुंगरू, रंगीबेरंगी माळा, झूल आणि इतर साहित्यही बाजारात आले आहे. त्यामुळे बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे बाजारपेठेत सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विक्रेते म्हणाले, “बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा ठाणे बाजारपेठेत मातीच्या आणि लाकडी बैलजोड्यांना चांगली मागणी आहे. आम्ही गेल्या ४० वर्षांपासून सागर आर्टच्या माध्यमातून सुबक बैलांच्या मूर्ती घडवून विक्री करत आहोत. यंदाही विविध आकार आणि रंगांमध्ये मूर्ती उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे महागाई वाढली असली तरी ग्राहकांचा विचार करून मूर्तींचे दर वाढवलेले नाहीत.”