
भाजप ठाणे शहर जिल्हा व शारदा संकल्प प्रतिष्ठानतर्फे ‘गोकुळ हंडी २०२६’चे आयोजन
ठाणे, दि. ३ : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोकुळ हंडी २०२६’ या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर श्रीकृष्ण दादू पाटील यांच्या पुढाकाराने हा उत्सव रंगणार असून, यंदा तब्बल ५६ लाख रुपयांची बक्षिसे गोविंदा पथकांना दिली जाणार आहेत.दहीहंडी उत्सवासाठी शहरातील तसेच परिसरातील विविध गोविंदा पथके सज्ज झाली असून, उंचच उंच मानवी मनोरे रचत हंडी फोडण्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. मोठ्या बक्षिसांमुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, उत्कृष्ट कामगिरीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
पारंपरिक दहीहंडी उत्सवाला आधुनिकतेची जोड देत यंदा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी आकर्षक बक्षिसे, सन्मान आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.दरम्यान, केवळ जल्लोष आणि मनोरंजनापुरता हा उत्सव मर्यादित न ठेवता नशामुक्तीचा सामाजिक संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे आणि निरोगी, नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.जल्लोष, गोविंदांचा थरार, ५६ लाखांची बक्षिसे आणि सामाजिक संदेश यामुळे ‘गोकुळ हंडी २०२६’ ठाणेकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक श्रीकृष्ण दादू पाटील यांनी केले आहे.