
ठाणे, दि. ३ (प्रतिनिधी) : ‘संकल्प दहीहंडी उत्सव… संकल्प नव्या उंचीचा!’ या संकल्पनेनुसार आमदार रविंद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली संकल्प प्रतिष्ठानतर्फे यंदाचा २१वा दहीहंडी उत्सव शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता संकल्प चौक, रघुनाथ नगर, वागळे इस्टेट येथे आयोजित करण्यात आला आहे. परंपरेला आधुनिकतेची जोड देत यंदाचा उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून, गोविंदा पथकांमध्ये उंच थरांची चुरस पाहायला मिळणार आहे.यंदाच्या उत्सवातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच १० थर रचणाऱ्या पथकासाठी १० लाख रुपये, तर ठाण्यात प्रथमच ९ थर रचणाऱ्या पथकाला ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
याशिवाय ३ ते ८ थरांसाठी पुरुष आणि महिला गोविंदा पथकांनाही आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.या दहीहंडी सोहळ्यात ५०० हून अधिक गोविंदा पथके सहभागी होण्याची अपेक्षा आहे. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, मानवी मनोऱ्यांचा थरार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संकल्प चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांकडून हेल्मेट, सेफ्टी रोप, सुरक्षा जॅकेट तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्दीचे व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान, अमीर हडकर यांच्या स्वामी समर्थ इव्हेंट आणि मराठी Buzz यांच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा सहभाग राहणार आहे. ‘हास्य जत्रा’ फेम अमीर हडकर यांच्यासह अभिनेता दिगंबर नाईक, दीपक वेतकर आणि राजू फाटक यांची उपस्थिती उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.‘परंपरा २१ वर्षांची, उत्साह नव्या उंचीचा!’ या घोषवाक्यासह होणाऱ्या या उत्सवात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक रविंद्र फाटक यांनी केले आहे.