
ठाणे, ता .२ (प्रतिनिधी): गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मातीच्या मडक्यांच्या बाजारपेठेला रंगत आली असली, तरी यंदा पारंपरिक मोठ्या हंड्यांपेक्षा छोट्या डिझाइनर आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार तयार करण्यात येणाऱ्या कस्टमाइज मडक्यांची क्रेझ अधिक पाहायला मिळत आहे. विविध रंगसंगती, आकर्षक नक्षीकाम आणि खास सजावटीमुळे ही मडकी घरगुती देखावे, बाळकृष्णाच्या सजावटीसह भेटवस्तूंसाठीही खरेदी केली जात आहेत.गोकुळाष्टमीच्या हंगामासाठी तब्बल सहा महिन्यांपूर्वीपासून मडकी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यंदा मोठ्या डिझाइनर मडक्यांसह छोट्या आकारातील रंगीत आणि आकर्षक मटक्यांना ग्राहकांकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार नाव, रंग, विशिष्ट डिझाइन किंवा सजावट करून देण्याच्या ऑर्डरमध्येही वाढ झाली आहे.कस्टमाइज मडक्यांसाठी ग्राहक एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत खर्च करण्यास तयार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
एका मडक्यावर विशेष डिझाइन आणि सजावटीसाठी सुमारे ३०० ते ५०० रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे साध्या मडक्यांबरोबरच कलात्मक आणि वेगळ्या स्वरूपाच्या मडक्यांना बाजारपेठेत नवी ओळख मिळत आहे.ठाण्यातून मुंबई, भाईंदरसह विविध भागांत मडक्यांचा पुरवठा करण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे अडीच हजार मडक्यांची विक्री झाली आहे. टेंभी नाका आणि जांभळी नाका परिसरातील सार्वजनिक दहीहंडी मंडळे, आयोजक तसेच विविध संस्थांकडूनही विशेष डिझाइनच्या मडक्यांसाठी ऑर्डर येत आहेत.दरम्यान, पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे वाहतूक व उत्पादन खर्च वाढल्याने मडक्यांच्या भावात सुमारे २० रुपयांची वाढ झाली आहे. तरीही गोकुळाष्टमीच्या उत्साहामुळे बाजारपेठेतील मडक्यांची मागणी कायम असून, यंदाचा सण पारंपरिकतेसोबत आधुनिक डिझाइनचा रंग घेऊन आला आहे.
“यंदा छोट्या डिझाइनर आणि कस्टमाइज मडक्यांना विशेष मागणी आहे. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार मडकी तयार करून दिली जात आहेत.”— मिनू सुरेंद्र साहा, विक्रेते