
ठाणे, ता. १ (प्रतिनिधी): श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीचा उत्सव जवळ येताच ठाण्यातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांत बाळकृष्णाच्या आगमनाची तयारी सुरू असून, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंसह आकर्षक पाळणे आणि बाळकृष्णाच्या मूर्तींच्या खरेदीसाठी नागरिक बाजारपेठांकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील नागरिक स्टील सेंटरमध्ये विविध प्रकारच्या पाळण्यांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे.
दुकानात तब्बल २०० हून अधिक प्रकारचे पाळणे उपलब्ध असून, लहान आकारापासून मोठ्या आणि आकर्षक डिझाइनच्या पाळण्यांपर्यंत ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गोल्डन कलरच्या ऑक्सिडाईज्ड पाळण्यांसह सुंदर मीनाकारी काम केलेले पाळणे ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. तसेच चांदीसारखा आकर्षक लूक असलेले व्हाईट मेटलचे पाळणेही उपलब्ध आहेत.
पारंपरिक वस्तूंना पसंती देणाऱ्या ग्राहकांसाठी शीशम लाकडापासून तयार करण्यात आलेले नक्षीकामयुक्त फोल्डिंग पाळणेही येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. जन्माष्टमीनंतर हे पाळणे सहजपणे फोल्ड करून सुरक्षित ठेवता येत असल्याने त्यांना मागणी आहे. याशिवाय झोपडीच्या आकारातील सजावटीचे पाळणेही विशेष आकर्षण ठरत आहेत.
किमतींचा विचार करता, लहान पाळणे १०० रुपयांपासून उपलब्ध असून विविध आकार आणि गुणवत्तेनुसार मोठ्या पाळण्यांच्या किमती ७ ते ८ हजार रुपयांपर्यंत आहेत. पितळ आणि अष्टधातूपासून तयार केलेल्या आकर्षक बाळकृष्णाच्या मूर्तीही २०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. त्यामुळे गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर नागरिक स्टील सेंटरमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढत असून, बाळकृष्णाच्या स्वागताचा उत्साह बाजारपेठेतही दिसून येत आहे.
