
ठाणे, ता . २० (प्रतिनिधी) : जिंकुशल कार्डियाक केअर, ठाणे येथे हृदयाच्या ठोक्यांचा वेग कमी होणाऱ्या रुग्णांसाठी अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले. डॉ. मयूर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ७६ वर्षीय अशोक नेत्रावली आणि ७२ वर्षीय राजेंद्र पंडित यांच्यावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ठाणे शहरातील हे पहिले लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपण असल्याचे सांगण्यात आले.
पारंपरिक पेसमेकरमध्ये छातीखाली उपकरण बसवून तारा हृदयापर्यंत नेल्या जातात. त्यामुळे संसर्ग, रक्तस्राव, लीड खराब होणे किंवा हालचालींवर निर्बंध यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र लीडलेस पेसमेकर हा व्हिटॅमिन गोळीएवढ्या आकाराचा असून तो जांघेतील शिरेतून थेट हृदयात बसवला जातो. त्यामुळे छातीवर जखम राहत नाही, तारा लागत नाहीत आणि संसर्गाचा धोकाही कमी होतो. या प्रक्रियेनंतर रुग्णांना अवघ्या एक ते दीड दिवसांत रुग्णालयातून घरी जाता येते. तसेच दुसऱ्या दिवसापासून योगा, चालणे व दैनंदिन कामे सुरू करता येतात. पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत या उपकरणाची बॅटरी १४ ते २२ वर्षांपर्यंत टिकू शकते. हृदयाच्या पेसिंग उपचार क्षेत्रात लीडलेस पेसमेकर हे आधुनिक, सुरक्षित आणि कमी आक्रमक तंत्रज्ञानाचे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
“लीडलेस पेसमेकर हे हृदयाच्या ठोक्यांच्या उपचारातील आधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान आहे. ठाण्यात ही सेवा सुरू केल्यानंतर अवघ्या एका महिन्यात ७ ते ८ आणि गेल्या वर्षभरात सुमारे २० यशस्वी प्रत्यारोपणे करण्यात आली आहेत. सध्या अमेरिकेतील ॲबॉट आणि युरोपमधील मेडट्रॉनिक कंपनीचे लीडलेस पेसमेकर वापरले जात आहेत. या तंत्रज्ञानामुळे संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णाला लवकर डिस्चार्ज मिळतो आणि दैनंदिन जीवन अधिक आरामदायी बनते,” असे डॉ. मयूर जैन यांनी सांगितले.
“हार्ट बीट्स खूप कमी होत असल्याने मला वारंवार त्रास जाणवत होता. डॉ. मयूर जैन यांच्या सल्ल्यानुसार हॉल्टर टेस्ट केल्यानंतर पेसमेकरची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी लीडलेस पेसमेकरचा पर्याय सुचवला. अवघ्या काही मिनिटांत शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आणि आज माझे हृदयाचे ठोके नियमित आहेत. मला कोणताही त्रास होत नाही. या आधुनिक उपचारामुळे माझे जीवन पुन्हा पूर्ववत झाले असून मी अत्यंत समाधानी आहे,” असे अशोक नेत्रावली (रुग्ण) यांनी सांगितले.