
ठाणे : प्रतिनिधीठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे संशय निर्माण होत असून, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जळालेल्या सर्व फाईल्सचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.घटनेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी शहर विकास विभाग हा महापालिकेतील सर्वाधिक संवेदनशील विभाग असल्याचे सांगितले. विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, आरक्षणे आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा संबंध या विभागाशी असताना येथे पुन्हा आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.काँग्रेसच्या मते, यापूर्वीही महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र प्रत्येक घटनेनंतर चौकशीची घोषणा होते, परंतु त्यातून नेमके काय निष्पन्न झाले याची माहिती नागरिकांसमोर येत नाही.
त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे ठाणे जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी स्पष्ट केलं.महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये वारंवार आग लागत असेल तर ती बाब प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सुदैवाने ही घटना दिवसाच्या सुरुवातीला उघडकीस आली. अन्यथा मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेच्या सर्व इमारतींचे तातडीने फायर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.तसेच आगीत जळालेल्या सर्व फाईल्स व कागदपत्रांची यादी सार्वजनिक करावी, नष्ट झालेल्या नोंदींची पुनर्बांधणी करावी आणि महापालिकेचा संपूर्ण डेटा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करून त्याचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.*”शहर विकास विभागासारख्या संवेदनशील विभागात वारंवार आग लागणे ही केवळ योगायोगाची बाब मानता येणार नाही. जळालेल्या फाईल्सची माहिती तातडीने जाहीर करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. नागरिकांचा विश्वास टिकवायचा असेल तर प्रशासनाने पूर्ण पारदर्शकता दाखवली पाहिजे.राहुल पिंगळे, (काँगेस जिल्हा शहर अध्यक्ष)