
ठाणे – मध्यप्रदेशातून मोफेड्रॉन ड्रग्जची तस्करी करण्यासाठी आलेल्या आंतरराज्य टोळीतील पाच जणांच्या मुंब्रा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बासू सय्यद, राम सिंग गुर्जर, कैलाश बलाई, मनोहर गुर्जर आणि राजू उर्फ रियाज मन्सूरी अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी २७ कोटी २१ लाख ७७ हजार ७५० रुपयांचा १३ किलो ६२९ ग्राम एमडी जप्त केला आहे. मुंब्रा येथील बिलाल हॉस्पिटलजवळ एक जण एमडी ड्रॅग विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून बासू सय्यद याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्याकडून पोलिसांना २३ ग्राम एमडी मिळाले होते. त्याला पोलीसी खाक्या दाबताच त्याने हे एमडी मध्यप्रदेशातील राम सिंग गुर्जर, कैलाश बलाई आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने कसोशीने तपास करत राम आणि कैलाश या दोघांवर झडप घातली.
त्यांच्याकडून पोलिसांना ७ कोटी ३० लाख ५६ हजारांचे ३ किलो ५१५ ग्राम एमडी मिळाले. हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज व्यक्त करत पोलिसांनी पुढील तपास केला असता या टोळीत मनोहर गुर्जर आणि राजू उर्फ रियाज मन्सूरी यांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले. रतलाम जिल्ह्यात कोंबीग ऑपरेशन मनोहर आणि राजू हे दोघे मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रतलाम जिल्ह्यात सापळा रचला आणि फिल्मी स्टाईल कोम्बिंग ऑपरेशन करत त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलिसांना १९ कोटी ९१ लाख २० हजारांचे ९ किलो ९५६ ग्राम एमडी पोलिसांना मिळाले. या पाचही जणांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता ते आंतरराज्य टोळीत सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. या पथकाची धडाकेबाज कारवाई मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) राजु पात्तोरकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) नितीन पगार, सहायक पोलिस निरीक्षक रोहीत केदार, गणेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक राम दळवी, पोलिस हवालदार राजाराम शेगर, पोलिस शिपाई सागर महांगडे, निलेश वर्षे, नवनाथ तेलंगे, सचिन पाटील, वसीम तडवी, सागर सपकाळे, प्रवीण पाटील, नवनाथ थोरवे या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.