
डोंबिवली, दि. ३ (प्रतिनिधी) – एकमेकांचे पदाधिकारी पक्षात घेण्यावरून काही दिवसांपूर्वी राज्य पातळीवर निर्माण झालेला वाद शमल्याचे वाटत असतानाच, डोंबिवलीत आज पुन्हा एकदा तो उफाळून आला. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेतर्फे घेण्यात आलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. “तर आम्हीही शांत बसणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महायुतीचा धर्म पाळत असतानाही आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना विविध आमिषे दाखवून भाजपमध्ये खेचले जात असल्याचा आरोप आमदार मोरे यांनी केला. “आमच्याकडे यायला तुमच्या पक्षातील अनेक जण रांगेत आहेत; पण आम्ही युतीधर्म पाळतो,” असे सांगत त्यांनी भाजपवर बोट ठेवले.
आगामी कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘फोडाफोडी’च्या राजकारणाचे पडसाद राज्य मंत्रिमंडळापर्यंत उमटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांचे पदाधिकारी न घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले होते. असे असतानाही आज डोंबिवलीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे समजताच खळबळ उडाली, असा सूर शिवसेनेने लावला.रविंद्र चव्हाण हे चारवेळा आमदार राहूनही पक्षबांधणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते घ्यावे लागणे हे दुर्दैवी असल्याची टीका आमदार मोरे यांनी केली. तर “डोंबिवली सुशिक्षितांची नगरी आहे; येथे वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे,” असे म्हणत उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनीही भाजपवर निशाणा साधला. “वर्षानुवर्षे भाजप का मजबूत झाला नाही? आमच्या कार्यकर्त्यांबरोबरच आमची विकासकामेही चोरली जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. या घडामोडींमुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, शाब्दिक फैरींचे सत्र आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.