
ठाणे, ता. ८ (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील गणेश विसर्जन घाटांची तयारी वेगाने सुरू असून, भाविकांना विसर्जनावेळी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील सर्व विसर्जन घाटांवरील आवश्यक कामे १३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला दिले. महापौरांनी मंगळवारी विविध विसर्जन घाटांची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.मासुंदा तलाव येथील दत्त घाट, रायलादेवी येथील कृत्रिम तलाव आणि गायमुख येथील विसर्जन घाटांची महापौरांनी पाहणी केली. यापूर्वी कोपरी, कोलशेत आणि पारसिक येथील विसर्जन घाटांचाही त्यांनी आढावा घेतला होता. यावेळी घाटांवर सुरू असलेली कामे, भाविकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि वाहतूक नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.गणेश विसर्जनाच्या काळात कृत्रिम तलाव, विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच महापालिकेच्या तलावांभोवती बॅरिकेडिंग, विसर्जन घाटावर आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था, पावसाची शक्यता लक्षात घेऊन वेदरशेड आणि मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले. ध्वनिक्षेपक यंत्रणा, माहिती व सूचना फलक, निर्माल्य कलश, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.मासुंदा तलावातील दत्त घाटावर मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने विसर्जनाच्या ठिकाणी पाणी बदलण्याचे तसेच घाटाच्या चारही बाजूंना रंगरंगोटी करून परिसर सुशोभित करण्याचे निर्देश देण्यात आले. मोठ्या गृहसंकुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे गृहसंकुलांची संख्या विचारात घेऊन आवश्यक ठिकाणी विसर्जन टाक्यांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे.रायलादेवीसह महापालिकेने तयार केलेल्या सर्व कृत्रिम तलावांवर पुरेशा संख्येने सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विसर्जनावेळी कोणतीही अडचण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले.गायमुख विसर्जन घाटावर दरवर्षी मोठी गर्दी होत असल्याने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विसर्जनाच्या दिवशी होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गणेशमूर्ती स्वीकार केंद्रांचा लाभ घ्या
महापालिकेने विसर्जन घाटांव्यतिरिक्त विविध ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकार केंद्रे उभारली आहेत. भाविकांनी या केंद्रांचा लाभ घेऊन पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुका शक्य तितक्या लवकर काढाव्यात आणि महापालिका, पोलीस व वाहतूक विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले.