स्पर्धा नाही… परंपरा, संस्कार आणि उत्साहाचा वारसा!

ठाणे, दि. ३ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ (रजि.) आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने यंदाही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या २१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उत्सवाने यंदा २२ व्या वर्षात पदार्पण केले असून, परंपरा, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि उत्साहाचा अनोखा संगम या महोत्सवात पाहायला मिळणार आहे.स्नेहा आंब्रे आणि डॉ. सागर आंब्रे यांच्या आयोजनातून टिकुजीनी वाडी रोड, कोठारी कम्पाऊंड, २७ एकरसमोर, चितळसर-मानपाडा परिसरात हा दहीहंडी सोहळा रंगणार आहे. ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांच्या सहभागामुळे उत्सवाला चांगलीच रंगत येणार असून, ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष आणि उंचच उंच मानवी मनोरे यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे ‘मानाची दहीहंडी’. ही हंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपये रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
त्यामुळे विविध गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, थर रचण्यासाठी पथके सज्ज झाली आहेत.दहीहंडीच्या थरारासोबतच नागरिकांसाठी मराठी आणि हिंदी लोकनृत्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक उत्सवाबरोबरच मनोरंजनाची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.निवृत्त सैनिकांचा विशेष सन्मानयंदा नवयुग मित्र मंडळाच्या वतीने ठाणे जिल्हा सैनिक फेडरेशनमधील निवृत्त सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. देशसेवेसाठी योगदान दिलेल्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा गौरव सोहळा होणार आहे. कप्तान शंकर कदम, सुभेदार प्रमोद शिंदे, हवालदार राजू पाटील, हवालदार निलेश पाटील, हवालदार संभाजी दुधाडे, हवालदार जयदीप भोईर, हवालदार अंकुश साळुंखे आणि हवालदार ध्यानसिंग आहिरे यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.दोन दशकांहून अधिक काळ दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या नवयुग मित्र मंडळाने यंदाही सामाजिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक उपक्रमांची सांगड घातली आहे. त्यामुळे २२ व्या दहीहंडी महोत्सवाकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी तसेच ठाणे-मुंबईतील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्नेहा आंब्रे आणि डॉ. सागर आंब्रे यांनी केले आहे.