
ठाणे, ता. २१ (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय तणाव चिघळत चालला आहे. पक्षांतील नेत्यांना एकमेकांकडे खेचण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेला वाद आता थेट रस्त्यांवर येऊन ठेपला आहे. ठाण्यातील नौपाडा परिसरात भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिंदे गटाचे शाखाप्रमुख हरेश महाडीक यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री बीएसयूपी (BSUP) प्रकल्पातील घरांच्या नोंदणी शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी शिवसेना शाखेत जल्लोष करण्यात येत होता. याच वेळी नारायण पवार यांनी शाखाप्रमुख महाडीक आणि कार्यकर्ते महेश लाहने यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी दोघांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, कारवाईची मागणी केली आहे.घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भाजप नेत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे, तर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने घडलेली ही घटना राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांकडून पुढील काही तासांत गुन्हा नोंदविला जाण्याची शक्यता असून, निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक उग्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.