
ठाणे, ता.२८ (प्रतिनिधी) : शहरात भटके कुत्रे आणि इतर भटके प्राणी प्रायव्हेट संस्थांकडून उचलून नेण्याच्या वाढत्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, याबाबत अनेक तक्रारींवर आधारित चौकशीची मागणी खासदार नरेश मस्के यांनी केली आहे. शहरातील विविध भागांतून अशा घटना घडत असल्याच्या तक्रारी सतत प्राप्त होत असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की काही खाजगी संस्था ॲम्बुलन्स घेऊन येतात आणि परिसरातील भटके कुत्रे घेऊन जातात. अनेकांनी या प्रक्रियेचा पाठपुरावा केला असता काही प्राणी 10–15 दिवसांनी परत आणले जातात, तर काही अजिबातच परत येत नाहीत. नेमके हे प्राणी कुठे नेले जातात आणि त्यांचं पुढे काय होतं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने संशय वाढत आहे. काही नागरिकांना या विषयात लक्ष घालू नका अशा प्रकारचे धमकीवजा फोनही आल्याचे समोर आले आहे.काही लोकांच्या मते भटक्या प्राण्यांना अनधिकृतरीत्या उचलून नेऊन त्यांचा ऑर्गन ट्रान्सफर किंवा अन्य अवैध व्यवहारासाठी वापर करण्यात येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खासदार मस्के यांनी या आरोपांची पुष्टी नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अशा शंकेला वाव देणाऱ्या घटनांची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे ते म्हणाले. काही डॉक्टर आणि प्रायव्हेट टोळ्या यात सहभागी असू शकतात, अशी नागरिकांच्या अनुभवांवर आधारित शक्यता त्यांनी व्यक्त केली. या गटात बाहेरगावाहून आलेल्या बिहारी टोळी आणि काही महिलांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.खासदारांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला संबंधित ठिकाणांचे पत्ते, नागरिकांचे नंबर आणि मिळालेल्या तक्रारी सुपूर्द केले असून त्वरित तपास सुरू करण्याची मागणी केली आहे. तपास न झाल्यास या तक्रारी पोलिसांकडे देण्याची वेळ येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मस्के यांनी सांगितले की मानवतेच्या दृष्टीने हा प्रकार अतिशय गंभीर असून शहरात मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.