
ठाणे, ता. २६ (प्रतिनिधी): मार्गशीर्ष शुद्ध षठी ही तिथी ‘चंपाषष्ठी’ म्हणून साजरी केली जाते.चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाचे दर्शन घेतले जाते यासाठी ठाण्यातील प्रसिद्द अशा स्वयंभू खंडोबा मंदिरात भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. चंपाषष्ठीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ आणि ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला.
जय मल्हार मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेला चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात यशस्वीरीत्या संपन्न झाला.दिवसभरातील विविध धार्मिक–सांस्कृतिक कार्यक्रमांना ठाणे शहरासह आसपासच्या भागातून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्सवाची सुरुवात पहाटे 5 ते 7 या वेळेत श्री खंडोबा देवाच्या अभिषेक व पूजाविधीने झाली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची विशेष गर्दी दिसत होती. दुपारी 2 वाजता विटावा, ठाणे येथील श्री विठ्ठल कृपा भजनी मंडळाची भजनसंध्या आणि भजनसम्राट शंकर महाराज उतेकर यांचा कार्यक्रम यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यानंतर सायंकाळी 5.30 वाजता श्री खंडोबा महाराजांची महाआरती पार पडली. त्यानंतर रात्री 6 ते 10 या वेळेत भाविकांसाठी भंडारा (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला होता. मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. उत्सवाचा शेवट रात्री 10 वाजता झालेल्या जागरण व गोंधळ कार्यक्रमाने झाला. पुणे जिल्ह्यातील बेल्हा येथील शाहिर चंद्रकांत शिंदे आणि पार्टी यांच्या वाघ्या-मुरळीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला शिखर क्षण प्राप्त झाले आणि उपस्थितांनी देखील त्याला उत्स्फूर्त दाद दिली.उत्सवाचे आयोजन यशस्वीपणे पार पडण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप शिवले, उपाध्यक्ष संतोष नन्हे, सचिव सर्जेराव नन्हे, सहसचिव अंकुश पिंगळे, खजिनदार रोहिदास वायकर, उपखजिनदार रविंद्र पाटील, तसेच संचालक व सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान हा उत्सव अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.