
ठाणे, ता. २५ (प्रतिनिधी): ठाण्याच्या शहरी विकासातील दूरदृष्टीसाठी ओळखले जाणारे सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त “अक्षतांजली” स्मृतीसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, नगरविकास, क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रातील त्यांचा मोलाचा वाटा लक्षात घेऊन, २८ नोव्हेंबरपासून महिनाभर या कार्यक्रमांची मालिका सुरु होणार आहे.
कार्यक्रमाबाबत माहिती पत्रकार परिषदेत कमलेश प्रधान यांनी दिली. सह सचिव मानसी प्रधान, प्राचार्य डॉ. गणेश भगुरे, प्रा. संज्योत देऊसकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्मृतीसोहळ्याचे उद्घाटन २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी असतील. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रवीण दवणे यांच्या शब्दांतून ठाण्याच्या अस्मितेला साद घालणारे “ठाणे अभिमान गीत” प्रदर्शित होणार आहे. वैशाली सामंत व श्रीरंग भावे यांच्या आवाजात गायलेले हे गीत स्वरूप होनप यांनी संगीतबद्ध केले आहे. “अक्षतांजली” अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, ज्यात इको-फ्रेंडली वस्तूंचे प्रदर्शन, आंतरशालेय आणि महाविद्यालयीन चित्रकला व पोस्टर स्पर्धा, सतीश प्रधान ठाणे दौड, पुस्तक प्रदर्शन, कबड्डी स्पर्धा, राज्यस्तरीय रोजगार मेळावा व रक्तदान शिबीर यांचा समावेश आहे. महिनाभर चालणारा हा उत्सव ठाण्याच्या प्रगतीच्या मार्गदर्शक सतीश प्रधान यांच्या विचारांना पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.
“अक्षतांजली” अंतर्गत कार्यक्रमांची रूपरेषा
१) ऊर्जासेतू – इकोफ्रेंडली वस्तू आणि सामाजिक उपक्रम प्रदर्शन १३ डिसेंबर रोजी ९.३० ते ५.०० वाजेपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे होणार आहे.
२) चित्रकला स्पर्धा – आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन (कनिष्ठ) १६ डिसेंबर रोजी १०.३० – १२.३० वाजेपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे होणार आहे.
३) सतीश प्रधान ठाणे दौड – शहरस्तरीय रनिंग इव्हेंट १७ डिसेंबर रोजी ९.३० – ५.०० वाजेपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे होणार आहे.
४) पुस्तक प्रदर्शन – “यांनी घडविले ठाणे” १८–२० डिसेंबर रोजी १०.०० – ५.०० वाजेपर्यंत राम देवळे मध्यवर्ती ग्रंथालय येथे होणार आहे.
५) एकदिवसीय परिषद – “ठाणे व्हिजन २०४७: काल, आज आणि उद्या” १८ डिसेंबर रोजी ९.३० – २.०० वाजेपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे होणार आहे.
६) पोस्टर स्पर्धा – आंतरमहाविद्यालयीन (वरिष्ठ) १९ डिसेंबर रोजी १०.३० – १२.३० वाजेपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे होणार आहे.
७) निबंध स्पर्धा १९ डिसेंबर रोजी १२.०० – १.३० वाजेपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे होणार आहे.
८) कबड्डी स्पर्धा २० डिसेंबर रोजी सकाळी ८.०० वाजेपर्यंत श्री मावळी मंडळ, ठाणे येथे होणार आहे.
९) राज्यस्तरीय रोजगार मेळावा २० डिसेंबर रोजी ८.०० – ४.०० वाजेपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे होणार आहे.
१०) रक्तदान शिबीर २३ डिसेंबर रोजी १०.०० – ५.०० वाजेपर्यंत ठाणे रेल्वे स्थानक येथे होणार आहे.
११) “अक्षतांजली” — स्मृतीसोहळा समारोप २९ डिसेंबर रोजी ५.०० – ८.०० वाजेपर्यंत ज्ञानसाधना महाविद्यालय येथे होणार आहे.