
ठाणे, ता. ३ (प्रतिनिधी) – दमदार खेळाचे प्रदर्शन करत सदाशिव सातघरे संघाने ठाणे फ्रेंड्स युनियन आयोजित तुकाराम सुर्वे स्मृती १६ वर्षांखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा प्रवेश मिळवला. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्यांनी पहिल्या डावातील ३० धावांची आघाडी मिळवत सामन्यावर पकड बनवली.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोविंद पाटील संघाने १३७ धावा उभारल्या. अक्षत पटेल, अथर्व गावडे आणि दर्शन राठोड यांनी संयमी खेळी करत संघाला सव्वाशेच्या पुढे नेले. यावर प्रत्युत्तर देताना सदाशिव सातघरे संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. आयुष सुर्वेने ४ बळी घेत प्रतिस्पर्ध्यांच्या डावाला सुरूवातीलाच खिंडार पाडले, तर अरिन चौबळ आणि रुद्र गिरी यांनीही महत्त्वाचे बळी मिळवले.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सदाशिव सातघरे संघाने तन्मय मालुसरेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १६७ धावा केल्या. राघव उपाध्याय आणि शायन शेख यांनी प्रत्येकी ३० धावा करीत संघाला स्थिरता दिली. विरोधी संघाकडून प्रशांत अल्लूने ५ बळी घेत चांगला प्रतिकार केला; मात्र आघाडी रोखण्यात तो अपयशी ठरला. पहिल्या डावातील आघाडीमुळे सदाशिव सातघरे संघाने अंतिम फेरीत मजल मारली.संक्षिप्त धावफलक :गोविंद पाटील संघ : पहिला डाव – सर्वबाद १३७ ( अक्षत पटेल २८, अथर्व गावडे ३१, दर्शन पटेल नाबाद १५, आयुष सुर्वे १०-४-१८-४, अरिन चौबळ १६-३-२४-३ , रुद्र गिरी ८-१-२३-२) विरुद्ध सदाशिव सातघरे : पहिला डाव – सर्वबाद १६७ (तन्मय मालुसरे ५२, राघव उपाध्याय ३०, शायन शेख ३०, प्रशांत अल्लू २०-८-४०-५, दर्शन राठोड १५.५-३-४८-२). पहिल्या डावातील ३० धावांच्या आघाडीमुळे सदाशिव सातघरे संघ विजयी..