
ऐतिहासिक श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिरात भाविकांची गर्दी..
ठाणे, ता. ४ (वंशिका चाचे) : दत्त भक्तीने रंगलेल्या ठाणे शहरात यंदाची दत्तजयंती मोठ्या धार्मिक उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच शहरातील सर्व दत्तमंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी केली होती. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषाने वातावरण उत्साहाने दुमदुमले होते.
यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणारे दमाणी इस्टेटमधील 113 वर्षे जुने श्री विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर भक्तांनी गजबजून गेले होते. 1912 साली आध्यात्मिक मार्गदर्शक नंद महाराज यांच्या सांगण्यावरून कै. विठ्ठल सायन्ना यादव यांनी हे मंदिर उभारले. ब्रिटिश काळातील पोस्ट ऑफिस, सीएसएमवीएस, एल्फिन्स्टन टेक्निकल स्कूल, ठाणे–कळवा पूल अशी अनेक नामांकित वास्तू उभारणारे आणि परोपकारी वृत्तीचे हे बांधकाम व्यावसायिक ठाणेकरांच्या स्मरणात आजही आहेत. शिर्डीचे साईबाबा, राष्ट्रसंत तुकोडी महाराज, गाडगे महाराज, तसेच बालगंधर्व आणि सवाई गंधर्व यांसारख्या कलाकारांनीही या मंदिराला भेट देऊन ते तत्कालीन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपास आणले. 1986 मध्ये मंदिराचे पुनर्बांधणीकरण झाले असून यादव कुटुंबाची पाचवी पिढी आजही मंदिराची सेवा आणि देखभाल करत आहे.
दत्तजयंतीनिमित्त या मंदिरात सकाळपासून विशेष पूजन, हवन, महाआरती आणि अन्नदानाचे आयोजन आले होते. शांत आणि सात्त्विक वातावरणात भाविकांनी दर्शन, नामस्मरण आणि प्रार्थना करून दत्तगुरूंच्या कृपेची अनुभूती घेतली. तसेच दिवसभर चाललेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेत ठाणेकरांनी परंपरा आणि श्रद्धेचा सुंदर संगम अनुभवला. संपूर्ण शहर आज भक्तिमय उत्साहात न्हाऊन निघाले.
ठाणे शहरातील कोपरी, नौपाडा, कोलशेत, वागळे इस्टेट, वर्तक नगरसह विविध भागांतील दत्तमंदिरांत विशेष अभिषेक, पूजा, कीर्तन, महाआरती व पालखी सोहळे पार पडला. अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरे, अन्नदान, स्वच्छता मोहिमा आणि महाप्रसादाचे आयोजन केले. ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छतेची भरीव व्यवस्था केली होती.