
मुंबई, ता. ११ (बातमीदार) : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) ९०० खाटांच्या नूतनीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना, या रुग्णालयात पीपीपी मॉडेलवर वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची आणि सर्वसामान्यांसाठी कर्करोग उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेल लागू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात केंद्र सरकारकडे केली.
सध्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. विद्यमान ३०० खाटांची व्यवस्था अपुरी पडत असल्याने आणि जुन्या इमारतींची अवस्था खराब झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून रुग्णालयाचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले. मात्र ठाणे हा देशातील वेगाने शहरीकरण होणारा जिल्हा असल्याने केवळ रुग्णालय निर्माण करणे पुरेसे ठरणार नसल्याचे खासदार म्हस्के यांनी अधोरेखित केले. वाढती लोकसंख्या, प्रचंड ओपीडी भार आणि गंभीर आरोग्यसेवेसाठी मुंबईवर अवलंबित्व लक्षात घेता, वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांची तातडीने आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पीपीपी मॉडेलवर वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास सुपर-स्पेशालिटी सेवा मजबूत होण्यासोबतच स्थानिक पातळीवर नवीन डॉक्टरांची निर्मिती होईल; तसेच मुंबईवरील आरोग्यसेवेचा ताणही लक्षणीयरीत्या कमी होईल.
अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ४,५०० कॅन्सर डे-केअर बेड आणि २०० नवीन कर्करोग केंद्रांच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. मात्र फक्त यंत्रणा उभारून तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसेल, तर संसाधने निष्प्रभावी ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले. म्हणूनच सर्व जिल्हा केंद्रांना टाटा मेमोरियलसारख्या राष्ट्रीय कर्करोग संस्थांशी जोडून ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेल अनिवार्य करण्याची त्यांनी मागणी केली. या पद्धतीत रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळून उपचार अधिक प्रभावी आणि सहज उपलब्ध होतील. दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या शहरांत न जाता त्याच दर्जाची सेवा मिळणे ही या मॉडेलची सर्वात मोठी गरज असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.