
ठाणे, ता. २९ (प्रतिनिधी) : कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या “माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या” या राज्यस्तरीय उपक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाणे पोलीस आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात सहभागी नागरिकांना पोलीसांच्या विविध विभागांचे प्रत्यक्ष कामकाज, तपास पद्धती, कायदेशीर मदत सेवा आणि पोलीस–नागरिक संवादाच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिक–पोलीस यांच्यातील दरी कमी करणे, परस्पर विश्वास वाढवणे आणि पोलीस कामकाजात पारदर्शकता आणणे हा होता.
उपक्रमादरम्यान नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी तसेच उपलब्ध विनामूल्य कायदेशीर मदत सेवांविषयी मार्गदर्शन देण्यात आले. स्थानिक सुरक्षेविषयक सूचना मांडत त्यांनी मुक्त संवाददेखील साधला. “नागरिक आणि पोलीस हे एकाच समाजाचे भागीदार आहेत. पारदर्शकता आणि संवाद वाढवणे हे आमचे ध्येय आहे,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी सांगितले.
विद्यार्थी साहिल यादव म्हणाला, “पोलीसांचे काम प्रत्यक्ष पाहण्याची ही अनोखी संधी होती; त्यांची शिस्त आणि जबाबदारी जवळून अनुभवता आली.” उपक्रमामुळे पोलीस–नागरिक संबंध अधिक दृढ झाल्याचे आयोजकांनी सांगितले.