
दिवा, दि. ४ (आरती परब) : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक २९अ मधून सर्वात कमी वयाची उमेदवार असलेल्या कु. वेदिका सुनिल आलिमकर यांनी आजपासून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. अपक्ष उमेदवार म्हणून त्या घरगुती गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असून, प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कु. वेदिका आलिमकर या उच्चशिक्षित उमेदवार असून त्यांनी फायनान्स विषयातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे. निधीचा योग्य नियोजनबद्ध वापर करून विकास कामे मार्गी लावण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या कार्यामागे वडील व सामाजिक कार्यकर्ते सुनिल आलिमकर यांची भक्कम भूमिका असून, त्यांच्या सामाजिक योगदानामुळे परिसरात वेदिकांना मोठा पाठिंबा लाभत आहे.
घराघरात जाऊन जनसंपर्क साधत नागरिकांच्या प्रश्नांचा थेट संवादातून आढावा घेतला जात असून, प्रभाग २९अ मध्ये नव्या नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे दिसून येत आहे.