
ठाणे, ता. १८ (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील सावरी गावात सापडलेल्या एमडी ड्रग कारखान्याशी आपला किंवा आपल्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नसल्याचे ठाण्यातील माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांकडून राजकीय द्वेषातून आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले. प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला ती जमीन आपली नाही. छापा पडलेली जमीन त्यांच्या जमिनीपासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असून दोन्ही जमिनींचे गट क्रमांक पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांच्या जमिनीचा गट क्रमांक १७/१ अ असून छापा पडलेल्या जमिनीचा गट क्रमांक ४/१ आहे. तसेच विरोधकांकडून उल्लेख करण्यात आलेली शिंदे कुटुंबाची दुसरी जमीन ही वडिलोपार्जित असून तिचा गट क्रमांक ३०/१० आहे. ही जमीन छापा पडलेल्या ठिकाणापासून सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर आहे.
आपल्या जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याचा कोणताही विचार नसून स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी कृषी पर्यटन सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित जमीन रणजित शिंदे याला विकण्यात आली असून त्याबाबतची सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रणजित शिंदे फरार नसून गावातच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांच्या एफआयआरमध्ये रणजित शिंदे यांचे नाव नाही आणि या गुन्ह्याशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हॉटेलमधून आरोपींना कोणतेही जेवण किंवा मदत दिली जात नव्हती, हेही पोलिस चौकशीत समोर आल्याचे शिंदे यांनी नमूद केले. उबाठा आणि काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे, निराधार व खोटे असून ते मागे न घेतल्यास अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. माध्यमांनी वस्तुस्थिती तपासूनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात, असे आवाहनही प्रकाश शिंदे यांनी केले.