
ठाणे, ता.२१ (प्रतिनिधी) :ठाण्यातील दिव्यांग बांधवांसाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली पेन्शन प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. कागदपत्रांतील त्रुटी, पडताळणीतील विलंब आणि लाल फितीत अडकलेल्या सुट्टीच्या शेकडो अर्जांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी सर्व प्रलंबित प्रकरणे ३० नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे डिसेंबरपासून पात्र दिव्यांगांना दरमहा २५०० रुपये पेन्शनचा लाभ मिळणार असून त्यांच्या उदरनिर्वाहाला दिलासा मिळणार आहे.
‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात जवळपास ५५ दिव्यांग व्यक्तींनी पेन्शन मिळण्यात होणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी मांडल्या होत्या. त्यानंतरच आमदार केळकर यांनी तातडीची बैठक बोलावून हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. सरकारी योजना जाहीर होतात, परंतु पाठपुरावा केल्यासच नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळतो, असे केळकर म्हणाले.कार्यक्रमात नालासोपाऱ्यातील १० वर्षांपासून गृहनिर्माण प्रलंबित असलेल्या रहिवाशांचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेतील वारसा हक्कातील अडचणी तसेच सायबर गुन्हे, एसआरए घोटाळे अशा विविध तक्रारींवरही तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली. बीएसयुपी प्रकल्पातील रहिवाशांनी घर नोंदणीचा प्रश्न सोडवल्याबद्दल आमदार केळकरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.