
ठाणे – ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या दुसर्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत अभिजीत पवार आणि पुजा शिंदे – विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काढलेल्या प्रचार रॅलीत हजारो महिला – पुरूष सहभागी झाले होते. या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रस्थापितांना धक्का बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास पारसिक नगर येथून अभिजीत पवार आणि पुजा शिंदे यांनी आपला अर्ज भरण्याच्या रॅलीला सुरूवात केली.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान हे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे झेंडे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे कटआऊट कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. सबंध प्रभागात ही रॅली फिरविण्यात आली. विशेष म्हणजे, या रॅलीदरम्यान स्थानिक गावकऱ्यांनी अभिजीत पवार आणि पुजा शिंदे यांचे जागोजागी औक्षण केले. या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, या रॅलीमध्ये फक्त कार्यकर्ते नाही तर सामान्य नागरिकही सहभागी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रभागात बदल होणारच आहे, असे सांगितले. तर, मनोज प्रधान यांनी , आमचे हे पॅनल प्रबळ असून येथे चारही जागांवर आम्हीच विजयी होऊ, असे सांगितले.