
ठाणे, ता. २१ (प्रतिनिधी: वंशिका चाचे) : मार्गशीषचा पहिला गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. ठाणेकर भक्तांना आता वेध लागलेत ते मार्गशीष गुरुवारनिमित देवीच्या घटस्थापनचे. या अनुषंगाने ठाणे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळू लागली असून ठाणे बाजारपेठ देखील विविध देवीचे मुखवटे,दागिने, कन्या पूजनचे साहित्य, रेडिमेट देवी, आधी वस्तूंनी बहरून गेली आहे.
अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपलेल्या मार्गशीर्षातील पहिल्या गुरुवारानिमित्त ठाणे बाजारपेठ सज्ज झाली असून नागरिक तयारीसाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. देवीच्या घटस्थापनेसाठी कृत्रिम फुलांच्या माळा, रंगीत साड्या, पूजेचे साहित्य, रेडीमेड व फोल्डिंग देवी, पारंपरिक दागिने, कन्या पूजन साहित्य आणि विविध देवींचे मुखवटे अशी आकर्षक सामग्री उपलब्ध झाली आहे. ९ रंगांच्या घटाच्या साड्या ₹100 ते ₹500, तर साधे व सजावटी मुखवटे ₹100 ते ₹2000 पर्यंत मिळत आहेत. फायबर, ऍक्रेलिक, मेटल व पीओपीचे महालक्ष्मी, दुर्गामाता, कालिका माता आदींचे मुखवटे विशेष लोकप्रिय ठरत आहेत. पारंपरिक आभूषणांसाठीही मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
मार्गशीष गुरुवारनिमित ठाण्यातील बाजारात देवीच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले आहे. दागिन्यांमध्ये ठुशी – ₹60 ते ₹500, कोल्हापुरी साज- ₹60 ते ₹500, तन्मणी- ₹100 पासून, अंबाबाई चंद्रकोर मंगळसूत्र- ₹100, पुतळे हार- ₹260, लक्ष्मी हार- ₹90, राणीहार- ₹ 150, पोहे हार- ₹150, कैरी हार- ₹260, कंबरपट्टा- ₹ 100, नथ – ₹30, बाजूबंद – ₹60, नथनीची बिंदी- ₹ 60, कवड्यांची माळ- ₹108 ते ₹330, कानातले- ₹30 असे विविध आकर्षक दागिने देखील नागरिकांसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. तसेच घरगृती घटस्थापनासाठी कमल आसन ₹400, फायबर हिरेजडित मुखवटे, कापडी, पीओपी व फायबरमध्ये रेडी मेड देवी, मार्गशीषसाठी वरलक्ष्मी (10 ते 18 इंच) ₹1200 ते ₹2200, सुहासिनीसाठी वाण सेट, आदी अश्या विविध रंगीबिरंगी व आकर्षक वस्तूंनी भाविकांचे मन वेढले असून भक्तांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू केली असल्याचे श्रृंगार वस्तू भंडारचे विक्रेते स्वप्नील यांनी सांगितले.