
ठाण्यात दत्तात्रय खराटकर यांच्या मुखवट्यांना मोठी मागणी..
ठाणे, ता. २५ (वंशिका चाचे) : मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचे खूप महत्व असून यंदा २७ नोव्हेंबर रोजी पहिला गुरुवार साजरा करण्यात येणार आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात नारळापासून तयार होणाऱ्या महालक्ष्मीच्या सुबक मुखवट्यांची जोरदार तयारी सुरू असून मूर्तीकार दत्तात्रय खराटकर यांनी घडवलेले नाजूक, रंगीत आणि हारांनी सजलेले मुखवटे सध्या नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.
मार्गशीर्ष महिन्यात देवीची पूजा अनेक घरांत पारंपरिक पद्धतीने केली जाते. देवीची सुबक मूर्ती सहज मिळत नसल्याने खराटकर यांचे नारळावर आधारित मुखवटे गृहिणींच्या पसंतीस उतरतात. या मुखवट्यातून देवीचे मंगलमय व जीवंत रूप अविष्कृत होते. नारळाचा आधार असल्याने व्रताचे चार गुरुवार पूर्ण झाल्यावर उद्यापन करून हा मुखवटा पाण्यात विसर्जित करता येतो — त्यामुळे हा पर्यावरणपूरक पर्यायही ठरतो. नारळ सर्वगुणसंपन्न मानला जातो आणि त्याच श्रीफळापासून देवीचे सुबक व रेखीव मुखवटे साकारण्याचे कौशल्य मूर्तीकार दत्तात्रय खराटकर यांच्याकडे आहे. गेल्या ३० वर्षांपासून खराटकर कुटुंबीय नारळावर शाडू माती, पीओपी, गणेशमूर्तींसाठी वापरले जाणारे रंग आणि मुंबादेवी–भुलेश्वर येथून आणलेल्या आभूषणांच्या साहाय्याने महालक्ष्मीचे आकर्षक मुखवटे घडवत आहेत. सुरुवातीला घरगुती पातळीवर बनवलेले चार–पाच मुखवटे आज मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागले असून ठाणे, मुंबई, रायगडसह अनेक भागांमधून मागणी वाढली आहे.
खराटकर सांगतात, “हे कौशल्य आमच्या घरातच उपजत आले. वडिल बंधूंनी 30 वर्षांपूर्वी नारळावर पहिली महालक्ष्मी मूर्ती घडवली आणि त्यानंतर महिलांच्या मागणीमुळे हा व्यवसाय वाढत गेला. आजही आम्ही तेवढ्याच प्रेमाने आणि कौशल्याने प्रत्येक मुखवटा घडवतो.” वाजवी दरात उपलब्ध असलेल्या या आकर्षक व पर्यावरणपूरक महालक्ष्मी मुखवट्यांसाठी भाविकांनी 8108228289 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दत्तात्रय खराटकर यांनी केले आहे.