
मुंबई, ता. २१ (प्रतिनिधी) – लोकप्रिय मालिका ‘ कुठे काय करते’ मधील अरुंधती देशमुख ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर आता नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर येत आहे. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्स निर्मित नवीन मालिकेत ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार असून, डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीराव फुले म्हणून झळकणार आहेत.
सावित्रीबाई फुलेंच्या जाज्वल्य संघर्ष, सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानावर आधारित ही मालिका प्रेक्षकांना त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून देणार आहे. इतिहासातील आदर्श स्त्रीची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मधुराणी म्हणाली, “सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व साकारणं ही मोठी जबाबदारी आहे. आपण आज ज्या स्वातंत्र्याने शिकतो, काम करतो, त्यासाठी त्यांनी अत्यंत कठीण संघर्ष केला होता.”
अमोल कोल्हे म्हणाले, “महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक आहे. सावित्रीबाईंचं समाजासाठीचं योगदान अवर्णनीय आहे. आज प्रत्येक स्त्रीसाठी त्या प्रेरणादायी आहेत.”
ही नवी मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांच्या भेटीला ५ जानेवारीपासून येत आहे.