
दिवा, ता. १३ (आरती परब) : दिवा शहरातील मातोश्री नगर येथे असलेल्या ड्यू ड्रॉप शाळेमध्ये किळसवाणा प्रकार घडला असून शाळेतील मुलांना बाथरुम मध्ये थेट गटाराचे पाणी वापरायला देण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. ड्यु ड्रॉप शाळेमध्ये मुलांना बाथरुम मध्ये गटाराचे पाणी वापरायला दिले जात असल्याची तक्रार दिवा मनसेच्या महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे पालकांनी केली होती. त्यानुसार आज त्याची सत्यता पडताळण्यासाठी आज मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेत भेट दिली. त्यावेळी हा अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला. मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या शाळा संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक शासन करण्याची मागणी दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत तात्काळ शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी सर्व व्हिडिओ पाठवल्यानंतर उपायुक्तांनी तात्काळ पाहणी करण्यासाठी शिक्षण विभागाची टीम पाहणी करण्यासाठी पाठवत असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिक्षण विभागाने संबंधित शाळेची मान्यता रद्द करून मुलांना दुसऱ्या शाळेत हलवावे अशी मागणी दिवा मनसेकडून करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, उपशाध्यक्ष जितेंद्र गुरव हे पदाधिकारी उपस्थित होते.