
दिवा, ता. २५ (आरती परब) : डायघर डम्पिंग ग्राउंड बंद असल्याचा फटका दिवा परिसराला मोठ्या प्रमाणात बसत असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम आता दिवा पोलीस चौकीच्या अगदी शेजारील रस्त्यावर दिसू लागला आहे. चौकीला लागूनच साचलेल्या कचऱ्याच्या प्रचंड ढिगामुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरली असून माशा, डास व इतर कीटकांची वाढ झाल्याने पोलिस कर्मचारी मोठ्या आरोग्याच्या धोक्यात काम करत आहेत.
समाजाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या चौकीलाच कचरा वेढा घालत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या अस्वच्छतेमुळे केवळ पोलिसांनाच नव्हे तर परिसरातील स्थानिक नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे महापालिकेने येथील कचरा तात्काळ उचलावा, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, अशी तीव्र मागणी पोलिसांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे दिव्यात आरोग्यविषयक संकटाची स्थिती निर्माण होऊ नये; यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.