
दिवा, दि. १० (आरती परब) : भाजपा दिवा शीळ मंडळ आणि डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या शिबिरात दोन मोतीबिंदूग्रस्त रुग्ण निदर्शनास आले, त्यानंतर विशेष उपक्रमांतर्गत त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. डॉ. अग्रवाल डोळ्यांचे हॉस्पिटलमध्ये काल या दोन्ही रुग्णांची मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. हा उपक्रम भैय्यासाहेब बंडगर (राष्ट्रीय उपाध्यक्ष, टायगर ग्रूप – भारत) यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला होता.
शस्त्रक्रिया पार पाडताना आणि रुग्णांना भेट देण्यासाठी सचिन भोईर, अध्यक्ष भाजपा दिवा-शीळ मंडळ , सतीश केळशीकर (भाजपा युवा मोर्चा, ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस, टायगर ग्रूप ठाणे जिल्हा अध्यक्ष हे मान्यवर उपस्थित होते. नेत्र तपासणी शिबिरातून पुढे असा उपयुक्त आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम पुढे येणे हे कौतुकास्पद असल्याचे नागरिकांनी नमूद केले. दोन रुग्णांच्या दृष्टीसाठी नवजीवन ठरणारा हा मोफत शस्त्रक्रिया उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.