
ठाणे, ता. २५ (प्रतिनिधी) : पॅशनने केलेली कोणतीही गोष्ट व्यक्तीला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवते. सायकलिंग हा सर्वांना सहज उपलब्ध, पर्यावरणपूरक आणि प्रभावी व्यायामाचा उत्तम पर्याय असून, यामुळे शरीरासोबत मनही तंदुरुस्त राहते, असे ठाण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्पष्ट केले.
‘आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन’तर्फे सोलापूरचे ज्येष्ठ सायकलपटू प्रकाश गिरी यांचा ठाणे पोलीस आयुक्तालयात विशेष सन्मान करण्यात आला. गेल्या काही वर्षांत त्यांनी तब्बल १३५९ राइड आणि १,०४,७६२ किमी पेक्षा अधिक प्रवास पूर्ण केला आहे. ‘सेंच्युरी मॅन’ म्हणून ओळखले जाणारे गिरी यांना डॉ. चव्हाण यांच्या हस्ते गौरवपत्र देण्यात आले. ६१ वर्षांच्या प्रकाश गिरी यांचे फिटनेसप्रेम आणि शिस्तबद्ध जीवनशैली प्रेरणादायी आहे. मागील तीन वर्षांपासून ते दररोज पहाटे १०० किमी सायकलिंग करतात. रात्री २.४० वाजता उठून ते सकाळी ३.४० वाजता राईडला सुरुवात करतात. सायकलिंगच्या मदतीने त्यांनी वजन ८९ किलोवरून ६३ किलोपर्यंत कमी केले—हा बदल फिटनेस जगतात आदर्श म्हणून पाहिला जातो. साठी ओलांडल्यानंतरही त्यांनी एक लाख किमीहून अधिक सायकलिंग करून वय हे केवळ आकडा आहे, हे सिद्ध केले.
डॉ. चव्हाण म्हणाले, ‘‘आजच्या धावपळीच्या जीवनात फिटनेसचे महत्त्व वाढत आहे. पोहणे, व्यायामशाळा, सायकलिंग अशा शारीरिक क्रियांकडे लोकांचा कल वाढलेला दिसतो. सायकलिंगसाठी स्वतंत्र ट्रॅक सर्वत्र नसणे ही खंत असल्याचेही त्यांनी नमूद केले; तरीही सायकलप्रेमी सुरक्षिततेची काळजी घेत सातत्याने सायकलिंग करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे.’’ प्रकाश गिरी यांनी फाऊंडेशनच्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, सायकलपटू काशिनाथ व मीनाक्षी गायकवाड, सुप्रिया पुरी, अनिकेत गद्रे आणि पत्रकार राजू काळे आदी उपस्थित होते.