
‘
१३ डिसेंबर २०२५ रोजी ठाण्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि उद्योगशील उपक्रमांचे आकर्षक आयोजन..
ठाणे, ता. १० (प्रतिनिधी: वंशिका चाचे) – ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलणारे आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तसेच माजी खासदार कै. सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात “अक्षतांजलि” उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या ‘ऊर्जा सेतू’ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात ठाणे शहरातील सुमारे 80 सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, सूक्ष्म उद्योग गट तसेच महिला बचत गट सहभागी होणार आहेत. साड्या, कुर्ती, दागिने, मातीशिल्प, कागदी दागिने, गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू, पर्सेस, गोधड्या अशा विविध वस्तूंची प्रदर्शने व विक्री या ठिकाणी होणार आहे. तर तरुण उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील स्टॉल्सद्वारे आपल्या कौशल्याची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.
प्रदर्शनातील पॉटर व्हील, रेखाचित्र करणारे कलाकार आणि जवळपास ४० खाद्यपदार्थ स्टॉल्स ही प्रमुख आकर्षणे ठरणार आहेत. २०१७ मध्ये सतीश प्रधान यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ‘ऊर्जा सेतू’ उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले आहे. या पत्रकार परिषदेस कमलेश प्रधान, डॉ. गणेश भगुरे, डॉ. संज्योत देऊसकर, डॉ. अनीता दक्षिणा हे उपस्थिती होते.