
ठाणे, ता. १८ (प्रतिनिधी) : तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थी, संशोधक व उद्योगजगताला एकत्र आणणारे ‘सृजन कुंभ २०२६’ हे राष्ट्रीय स्तरावरील उदयोन्मुख तंत्रज्ञान शिखर संमेलन येत्या १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी कल्याण येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि इंदाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक अँड फार्मसी, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कल्याण–मुरबाड रोडवरील बापसई येथील इंदाला कॉलेजच्या परिसरात हे दोन दिवसीय शिखर संमेलन पार पडणार असून, याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष दा. कृ. सोमण, सेक्रेटरी नामदेव मांडगे, इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक डॉ. विजय महाजन तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.या शिखर संमेलनाचा मुख्य उद्देश उद्योग–शिक्षण सहकार्य वाढवणे, कौशल्य विकासाला चालना देणे, संशोधनातून संकल्पनांचे प्रत्यक्ष रूपांतर घडवून आणणे आणि भविष्यातील करिअर संधी निर्माण करणे हा आहे. शैक्षणिक तज्ज्ञ, वैज्ञानिक, उद्योगतज्ज्ञ, स्टार्टअप्स, नवोन्मेषक, उद्योजक आणि विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग या संमेलनात असणार आहे.
परिषदेत रोबोटिक्स, IoT, 3D प्रिंटिंग आणि अन्य उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर कार्यशाळा, मॉडेल मेकिंग व पोस्टर सादरीकरण स्पर्धा, विद्यार्थ्यांचे प्रकल्प व स्टार्टअप्सचे सादरीकरण, तसेच आंतरशाखीय संशोधनावर आधारित उच्च दर्जाच्या संशोधन पेपर्सचे सादरीकरण होणार आहे. या प्रसंगी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी, डॉ. एस. वेंकटेश शर्मा यांचे मार्गदर्शन लाभणार असून IIT बॉम्बे, ISRO, L&T, NSDC, NCVET आदी संस्थांतील तज्ज्ञ व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ITI, फार्मसी व विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी हे शिखर संमेलन दिशादर्शक ठरणार आहे.