
डोंबिवली, ता. १३ (प्रतिनिधी) : डोंबिवली शहरात पुन्हा एकदा गंभीर रासायनिक प्रदूषणाचा प्रकार समोर आला आहे. शहराच्या एमआयडीसी परिसरातील संपूर्ण रस्ता चक्क गुलाबी रंगाचा झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. याआधीही डोंबिवलीत रासायनिक प्रदूषणाच्या अनेक धक्कादायक घटना घडल्या असून, त्यात आता आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या केमिकल्समुळे हवा, पाणी आणि पर्यावरणावर सातत्याने विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून केल्या जात आहेत. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरव्या रंगाचा पाऊस, तर नंतर ऑरेंज ऑईल मिसळलेला पाऊस पडल्याच्या घटना घडल्या होत्या. आता थेट रस्त्यावर गुलाबी रंगाचा थर साचल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
एमआयडीसीतील संपूर्ण रस्त्यावर गुलाबी रंगाचे केमिकल साचले असून, रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारातही मोठ्या प्रमाणात हे केमिकल आढळून आले आहे. या रासायनिक पदार्थांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे सन 2020 मध्येही असाच गुलाबी रस्त्याचा प्रकार समोर आला होता. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मात्र, पाच वर्षांनंतर पुन्हा तोच प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावेळी तरी संबंधित अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ गांभीर्याने कारवाई करणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. सतत घडणाऱ्या अशा रासायनिक प्रदूषणाच्या घटनांमुळे डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.