
“सात महिन्यात ४२७१ शस्त्रक्रिया यशस्वी
ठाणे : उपचारांचा खर्च परवड नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. वागळे इस्टेट येथील तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतर करूनही रुग्णसेवेत कुठेही खंड पडू न देता रुग्णालयाने गेल्या सात महिन्यांत तब्बल ४२७१ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. या शस्त्रक्रियांमध्ये २३२६ मेजर आणि १९४५ मायनर प्रकरणांचा समावेश असून सिझेरियन (LSCS), लेप्राटॉमी हर्निया टॉमी डोळे, दंत, अस्थीरोग, कान-नाक-घसा यांसह अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया सातत्याने पार पडल्या. दररोज ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे ५५०–६०० शस्त्रक्रिया होत आहेत. यात मेजर सर्जरी
लेप्राटॉमी हर्निया टॉमी सिझरियन सेक्शन हायड्रोसिल असून मायनर सर्जरी
डिब्रायमेंट इंसिजन अँड ड्रेनेज आदींचा समावेश आहे.
प्रामुख्याने उदाहरण द्यायचे झाले तर स्तनाच्या कर्करोगातून मुक्तता स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बाहेर काढत रुग्णालयाने ७८ वर्षीय महिलेची गाठ काढण्याची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. किशोरवयीन मुलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे निर्माण होणाऱ्या ‘गायनिकोमास्टिया’चा त्रास कमी करण्यासाठी २० वर्षीय तरुणावर प्रथमच कठीण ‘रिडक्शन आणि लिपोसक्शन’ शस्त्रक्रिया करण्यात आली. खाजगी रुग्णालयात अत्यंत खर्चिक ठरणारी ही प्रक्रिया सिव्हिलमध्ये यशस्वी झाली. काही रुग्णालयांनी नकार दिलेल्या मूकबधिर आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहीरचा अवघड मोतीबिंदू चा प्रश्न ठाणे सिव्हिलने सोडवला. अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करत त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणला. रुग्णालय तात्पुरत्या जागेत असले तरी सेवा, तत्परता आणि संवेदनशीलता यात कुठेही तडजोड न करता ठाणे सिव्हिलने सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून स्वतःची ओळख अधिक बळकट केली आहे.”रुग्णालय तात्पुरत्या ठिकाणी असले तरी रुग्णसेवा अबाधित ठेवणे हेच आमचे ध्येय आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या सात महिन्यांत झालेल्या सव्वाचार हजार शस्त्रक्रिया आमच्या टीमच्या मेहनतीचे फलित असल्याचे डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे) यांनी सांगितले.